Tuesday, March 3, 2020

कूर्ग डायरीज ६

कूर्ग डायरीज ६

कूर्गला निरोप :

आज आमचा कूर्ग मधील शेवटचा दिवस. वेळ कसा पटकन निघून गेला हे कळलेच नाही. आमच्या या प्रवासात पर्यटनाबरोबरच आराम हे सुद्धा आमचे दुसरे ध्येय होते. वेळेअभावी बरीचशी स्थळे जरी या प्रवासात पाहता आली नसली तरीही त्याचे शल्य तितकेसे मनाला टोचत नव्हते कारण ज्या स्थळांना आम्ही भेट दिली होती ती एकतर खूपच छान होती आणि त्यांना भेट देण्याचा अनुभव एकदम पैसे वसूल होता. कूर्ग हे स्थळ पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे आहे यात शंकाच नाही. इथल्या निसर्ग सौंदर्याने अगोदरच मनावर गरुड केले होते. त्यात दाक्षिणात्य जेवणही अप्रतिम. त्यामुळे कुर्गचा निरोप घेणे कसेसेच वाटत होते. पण पर्यायही नव्हता.

सकाळी लवकरच दिवसाची सुरुवात केली. मुलींनाही लवकर उठवलं. सर्व सामान बांधून तयार झाल्यावर नाश्त्यासाठी खाली आलो. कुर्गमधील किंबहुना प्रशांती रेसॉर्टमधील शेवटचे डोसे आणि इडली-वडा मनसोक्त हादडून चेक आउटचे सर्व सोपस्कार पार पडले आणि गाडीमध्ये बसून पुढील प्रवासासाठी सज्ज झालो.

सकाळचे साधारण नऊ वाजले होते. कुर्गच्या आल्हाददायक हवेचा निरोप घेताना मनाला थोडे क्लेश झालेच. आज आम्ही म्हैसूर मार्गे श्रीरंगपट्टण ला जाणार होतो. खरेतर आम्ही डायरेक्ट बेंगलोरलाच निघणार होतो पण प्रवासाची दगदग एकाच दिवसात होऊ नये म्हणून कूर्ग मधील मुक्काम एका दिवस कमी करून श्रीरंगपट्टणला राहणार होतो. श्रीरंगपट्टण ला प्रशांती रेसॉर्टचे मालक यांच्या बंधूंचे योगा धाम रिट्रीट नावाचे एक रिसॉर्ट आहे. त्याबद्दल आम्हाला आमच्या चालकाने सांगितले होतेच. आता उत्सुकता होती म्हैसूर दर्शनाची.

म्हैसूरला पोचायला साधारण चार तास लागलेच. पोचल्यावर पहिला पोटोबा उरकून घेतला. भुकेल्या पोटी लष्कर चालत नाही त्यात आम्ही काय चालणार ?  पोटोबा नंतर थोडी खरेदी केली. आमचा चालक प्रकाश आज आम्हाला म्हैसूर पॅलेस दाखवणार होता. त्यानंतर प्राणिसंग्रहालय पाहण्याचा बेत होता. पण प्राणिसंग्रहालय पाच वाजता बंद होते असे कळले त्यामुळे म्हैसूर पॅलेस लांबूनच पहिला आणि प्राणिसंग्रहालय पाहायला गेलो. अपेक्षेप्रमाणे गर्दी होतीच पण मुली खुश होत्या.


तिकीट काढून आत शिरलो आणि सुरु झाला एक अविस्मरणीय अनुभव. आजवर आम्ही फक्त मुंबईतील वीर जिजामाता उद्यान हे एकमेव प्राणी संग्रहालय पाहिले होते. त्यामुळे इथे कोणकोणते प्राणी, पक्षी व वनस्पती पाहायला मिळणार याचे कुतूहल होते.

सुरुवातीच्या पिंजऱ्यांमध्ये प्रामुख्याने पक्षीच होते. त्यामध्ये मोर, करकोचा, विविधरंगी पोपट, कोंबडीच्या निरनिराळ्या प्रजाती, बदके, सफेद मोर असे विविध पक्षी होते. पक्ष्यांचा राजा गरुड तसेच घुबडासारखा पक्षी पाहून खरेच कुतूहल चाळवले गेले.  त्यातच लांबवर उभ्या असलेल्या खऱ्या अर्थाने राजबिंडा भासणाऱ्या आफ्रिकेतील मूलनिवासी जिराफाचे दर्शन झाले. पण ते खूपच लांब असावे कदाचित एक्झिट जवळ असावे.

जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसे नवनवीन प्राणी नजरेस पडत होते. आणि अश्यातच अतिचपल अश्या चित्त्याचे मनोहर रूप समोर आले. अवघ्या काही फुटांवर असलेला हा अप्रतिम सौष्ठव लाभलेला प्राणी अतिशय सुंदर दिसत होता.



या झूमध्ये माकडांच्याही अनेक प्रजाती आहेत. उदा. चिम्पान्झी. मानवाच्या मूळ रूपाचे दर्शन सुद्धा खरेच विलोभनीय होते. इथे हरीण, सांबर काळवीट यासारखे प्राणीही गुण्यागोविंदात राहतात. मग दिसतो वाघोबा. इथे तांबडा आणि पांढरा (रस्सा नाही बरं का !) असे दोन्हीही प्रकारचे वाघ पाहावयास मिळतात.

पांढरा वाघ

तांबडा वाघ

मांजरीच्या भाच्याचे दर्शन घेण्यात इतके गुंग झालो होतो की आजूबाजूचा पूर्ण विसर पडला होता. इतक्यात एक गगनभेदी डरकाळी कानावर पडली.... वनराजाची. वनराज सिंह आपल्याच तोऱ्यात फेऱ्या मारत होता. थकून जेव्हा एका ठिकाणी तो बसला तेव्हा कुठे फोटो काढायला फुरसत मिळाली आणि मग क्लीकक्लीकाट केला.

वनराज सिंह


देवाच्या या अप्रतिम निर्मितीला मनातच सलाम ठोकला. खरेतर सिंहापेक्षा वाघ नेहमी चपळ भासतो आणि असतो सुद्धा. सिंह कायम आळसावलेला दिसतो पण तरीही त्याच्या रूपात एक प्रकारचे खानदानी राजेपण दिसते जे पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. वाघ रागीट तर सिंह स्थितप्रज्ञ भासतो आणि चित्ता एकदम कपटी वाटतो मला.

पुढे ओव्हरकोट घातलेल्या एकशिंगी गेंड्याचे आणि पाणघोड्याचे सुद्धा दर्शन झाले. पण आम्हाला उत्सुकता होती. जिराफाच्या पुनर्दर्शनाची. पण ते एक्झिटजवळ पाहायला मिळतील असे कळले. आता नाही म्हटले तरी दोन तास होऊन गेले होते. तरीही खास थकावट वाटत नव्हती याला खरे कारण म्हणजे या उद्यानात ठिकठिकाणी विश्रांतीसाठी बसण्याच्या जागा तसेच प्रसाधनगृहे होती. इतके सुंदर नियोजन खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते.

जिराफ़दर्शनाच्या आशेने जात असताना मध्येच झेब्रा दिसला. हा एक प्राणी खूप छान दिसतो. मुलींनी हा प्राणी प्रथमच प्रत्यक्ष पाहिला होता.
एकशिंगी गेंडा




येथे सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी एक खास दालन आहे. हत्तीचे सुद्धा दर्शन झाल्याने मुली खुश झाल्या.हत्तीला पाहून  त्यांना गणपती बाप्पाची आठवण झाली. पाण्यात डुंबणारे आणि अजस्त्र लाकडी ओंडके उचलणारे हत्ती पाहून नजर तृप्त झाली.

आता एक्झिटपाशी येऊन पोचलो आणि जिराफाचे पुनर्दर्शन झाले. खरंच किती राजबिंडे रूप. अगदी डोळ्यातही  न मावणारी उंची लाभलेला हा सुंदर प्राणी आपल्याच विश्वात असल्यासारखा वावरत होता.



अतिसुंदर असा अनुभव घेऊन बाहेर आलो . आता थकवा जाणवत होता म्हणून पहिला चहा घेतला आणि श्रीरंगपट्टण ला प्रयाण केले. एव्हाना अंधार पडला होता. म्हैसूर पासून अवघ्या १५ ते २० किमी वर असलेले श्रीरंगपट्टण शहर खरेतर टिपू सुलतानाचे. आमचे रिसॉर्ट खरेतर एका गावात होते. हमरस्त्यापासून आत असेलेले हे रिसॉर्ट आम्ही पोचलो तेव्हा अंधारात गुडूप झाले होते. आम्ही चेक इन केले तेव्हा खूपच सामसूम होती. आमच्या चालकाला परिचित असल्याने त्याने तिथल्या केयरटेकर नीरज ला बोलावून खोली उघडून दिली. 

अंधार असला तरी पाण्याचा आवाज येत होता म्हणजे जवळच कुठे तरी नदीचा प्रवाह असावा. म्हणजे नक्कीच हे स्थान निसर्गरम्य असणार यात शंका नव्हती. चेक इन करून मस्त अंघोळ केली व जेवणासाठी हायवेवरील हॉटेल गाठून मस्तपैकी पोटपूजा केली.आजचा दिवससुद्धा सुंदर गेला होता म्हणून मनोमन त्या जगन्नियंत्याचे आभार मानले आणि पुढील प्रवासासाठी प्रार्थना केली. उद्याचा दिवस आमचा या सहलीतील शेवटचा असणार होता.उद्या यावेळी आम्ही नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत असणार होतो. त्यामुळे मनात मिश्रा भावना होती. रूम वर आलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. खूप प्रवासाने थकलो होतो म्हणून मस्त ताणून दिली.
















No comments:

Post a Comment