Monday, January 13, 2020

कूर्ग डायरीज ५

कूर्ग डायरीज ५


दिवस दुसरा :

पहिला दिवस तर छानच गेला होता त्यामुळे कूर्ग सहलीत आणखी काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता तर खूपच होती. कुर्गचे वातावरण खूपच आल्हाददायक आहे. इथला पावसाळा तर खूपच खतरनाक असतो. एकतर वळणावळणाचे डोंगरातून जाणारे अरुंद रस्ते आणि मुसळधार पाऊस यामुळे बाहेर निघणेही कठीण होऊन बसते असे मला काही स्थानिकांनी सांगितले. कूर्ग मधील पावसाचा थोडासा प्रत्यय मला बेंगळुरूहुन कुर्गमध्ये येत असतानाच आला होता. जणूकाही मुसळधार पाऊसधारांनी आमचे स्वागतच होत होते. सुदैवाने पावसाने पूर्ण सहलीत कोणताही व्यत्यय आणला नाही.

जेथे आम्ही राहत होतो त्या प्रशांती रिसॉर्ट मध्ये सुद्धा कॉफीची झाडे आणि मिरीचे वेल होते. कॉफीला लाल बेरी'ज लगडली होती. इथे रिसॉर्टमध्ये काही फुलांचे वेलही होते. त्याचे नाव माहित नाही पण दिसायला हि फुले पक्ष्यांसारखी दिसत, अगदी रंगीबेरंगी. त्याची प्रकाशचित्रे सोबत डकवत आहे. जाणकारांनी त्यावर प्रकाश टाकावा.




आता सुरुवात दुसऱ्या दिवसाची. सहलीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर तयार होऊन स्थलदर्शन करायचे ठरवले होते. कारण एकतर हातात वेळ कमी होता आणि जमेल तेव्हढे स्थलदर्शन आम्हाला करायचे होते , अर्थात उगाचच भराभर स्थळे न पाहता फक्त मोजकी आणि महत्वाची स्थळेच पाहावीत असे आमचे सर्वांचे मत पडले आणि आम्ही निघालो आमच्या आजच्या पहिल्या स्थळाला भेट द्यायला , म्हणजेच मदिक्केरी किल्ला. 

मदिक्केरी किल्ला हा मदिक्केरी सिटीमध्येच आहे. आता तिथे शासकीय कार्यालय आहे. हलेरी वंशाचा राजा मुद्दुराजा याने मदिक्केरी इ.स. १६८१ मध्ये वसवले . त्यावेळी हे शहर मुदराजनकेरी या नावाने ओळखले जात असे. कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन याचे मदिक्केरी असे नामकरण झाले. मदिक्केरी किल्ला मात्र कोडुगु वंशाच्या राजांनी बांधला. मूळचा मातीचा असलेला हा किल्ला पुढे टिपू सुलतानाच्या हातात आला. टिपूने ह्या किल्ल्याची ग्रॅनाईटच्या साहाय्याने पुनर्बांधणी केली आणि याचे नवीन नामकरण जफराबाद असे केले.



(किल्ल्याचे छायाचित्र आंतरजालावरून साभार) 

किल्ल्यात एक चर्चही आहे जे ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८५९ मध्ये बांधले असल्याचा उल्लेख सापडतो . आता या इमारतीत कर्नाटक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संग्रहालय (म्युझियम) चालवले आहे. या संग्रहालयामध्ये आपल्याला मुद्दुराजा ते टिपू सुलतान व ब्रिटिश सरकार पर्यंतच्या पुरातन वस्तू प्रामुख्याने शस्त्रास्त्रे पहावयास मिळतात. वेळेअभावी आम्हाला हे संग्रहालय पाहता नाही आले त्यामुळे एक ऐतिहासिक वारस पाहण्याची संधी हुकल्याची रुखरुख मनास लागून राहिली. 

मदिक्केरी किल्ला पाहिल्यानंतर आमची मोहीम वळाली ते ओंकारेश्वर मंदिराकडे. कर्नाटकातील किंबहुना दक्षिण भारतातील मंदिरे पाहणे हि एक सांस्कृतिक मेजवानीच असते. अत्यंत सुंदर अशी ही मंदिरे बनवताना लागलेले कष्ट याची कल्पनाच न केलेली बरी. पण त्या मंदिरांवरची कलाकुसर पाहताना खरेच भान हरपून जाते. 

श्री ओंकारेश्वराचे मंदिर मदिक्केरी सिटीमध्येच आहे. मार्केटपासून काहि किमी अंतरावर असलेले हे सुंदर मंदिर आणि त्यासमोरचा जलाशय हे दृश्य खूपच मनोहारी आहे. मंदिर बरेच जुने असावे. शिवाचे हे मंदिर म्हणजे दाक्षिणात्य स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे. ओंकारेश्वराचा आशीर्वाद घेऊन आम्ही पोटपूजा करण्यासाठी उडुपी नावाच्या रेस्टॉरंट मध्ये आलो. उत्तम आणि रुचकर शाकाहारी जेवणासाठी हे ठिकाण एक छान पर्याय ठरू शकते. 

जेवण करण्यासाठी सिटीमधीलच उडुपी नावाचे एक छान आणि प्रशस्त आवार असलेले असे रेस्तरॉं आहे. पुन्हा दाक्षिणात्य जेवणाचा आस्वाद घेतला. पण या हॉटेल मध्ये छान उत्तर भारतीय आणि चायनीज पदार्थ सुद्धा मिळतात. एकूणच छान अनुभव होता. 



पोटोबा झाल्यानंतर आम्ही आबे फॉल्स म्हणजे आबे धबधबा पाहायला निघालो. मदिक्केरी सिटीजवळच असलेला हा मनोहारी धबधबा आवर्जून पाहण्यासारखाच आहे. संपूर्ण कूर्ग प्रवासात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे प्रत्येक पर्यटनस्थळावर कचरा होऊ नये यासाठी चोख व्यवस्था होती. आमचा चालक प्रकाश सुद्धा प्लास्टिक इतस्ततः न फेकण्याबद्दल सजग होता. आमच्याजवळील प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक रॅपर्स सुद्धा तो आग्रहानं आमच्याकडून मागून कचरापेटीत टाकत असे. 

आबे धबधबा हा अतिसुंदर जंगलाने वेढलेला आहे. तिथे सुद्धा पर्यटकांची बरीच गर्दी दिसत होती. कावेरी नदीवरच असलेला हा धबधबा खूपच सुंदर दिसतो. येथे पाण्यात उतरण्यास परवानगी नाही. कोणी पाण्यात उतरू नये म्हणून संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. पर्यटकांना धबधबा नीट पाहता यावा यासाठी मचाणाची व्यवस्थाही आहे. एकंदर धबधब्याची व्यवस्था खूपच छान रीतीने करण्यात आली आहे. 



आबे धबधबा पाहण्यास थोडा जास्त वेळ लागला असल्याने त्वरित तळकावेरी साठी निघालो. तळकावेरी हे उंचावर स्थित असलेले कावेरी नदीचे उगमस्थान आहे. मदिक्केरी पासून साधारण ४० किमीवर असलेले तळकावेरी ब्रह्मगिरीच्या उंच डोंगरांमध्ये वसलेले आहे. तळकावेरीच्या रस्त्यावरच भागमंडला हे भागंडेश्वराचे म्हणजेच महादेवाचे सुंदर व प्राचीन मंदिरसुद्धा आहे. 


(भागमंडला मंदिराचे छायाचित्र आंतरजालावरून साभार)

तळकावेरी मंदिर परिसर हा खर्च खूप सुंदर आणि मनोरम आहे. हवेत अजूनही गारवा आणि धुके दिसत होते. मंदिराच्या आवारातून मदिक्केरीचे दर्शन होते. मंदिराची व्यवस्था सुद्धा खूप सुंदर आहे. कावेरी नदीला म्हणजेच "कावेरम्माला"कर्नाटकात खूपच जिव्हाळ्याचे स्थान आहे. कर्नाटकाची जीवनदायिनीच असलेली कावेरी नदी आणि तिचे उगमस्थान पाहताना मनात एक पवित्र भावना उमटली. आपोआपच माझे हात कावेरी मंदिरासमोर जोडले गेले. 

तळकावेरी स्थान पाहून अगदी आपल्या महाबळेश्वरचीच आठवण झाली. अगदी तसाच नयनरम्य परिसर, नागमोडी वळणे आणि थंड गुलाबी हवा असे अगदी रोमांचक वातावरण आपल्याला महाबळेश्वरचीच आठवण करून देते.


(कावेरी मंदिराचे छायाचित्र आंतरजालावरून साभार) 

तळकावेरीहून मदिक्केरीला येताना एक कॉफी प्लांटेशन फार्म आहे त्यास भेट द्यावी असा आमच्या चालकाचा आग्रह होता. आम्हालाही कॉफीच्या शेतीविषयी माहिती हवी होतीच. मग काय दिली भेट त्या फार्मला. 
"Pappy's Coffee Island" असे नाव असलेल्या त्या फार्ममध्ये आम्ही शिरलो. येथे कॉफी प्लांटेशन आणि कूर्ग मधील इतर मुख्य शेतीबद्दल माहिती दिली जाते. यासाठी माणशी रु. २०० आकारले जातात. प्रथमतः हे थोडे महाग वाटेल पण अनुभव लाखमोलाचा मिळतो एवढे निश्चित. पैसे भरल्यानंतर आमची भेट आमच्या मार्गदर्शकासोबत घालून देण्यात आली . काही पर्यटक अगोदरच तिथे होते. मार्गदर्शक हा खरंच खूप ज्ञानी असावा कारण तो आमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित आणि हजारजबाबीपणे देत होता. 

या फार्म मध्ये कॉफीच्या "रोबस्टा" आणि "अरेबिया " या जातींबद्दल माहिती देण्यात आली. तसेच चिकोडी या नवीन पदार्थाबद्दल ऐकायला मिळाले जो एका रानवनस्पतीच्या मुळापासून बनतो आणि ओरिजिनल कॉफीमध्ये प्रमाण वाढवण्यासाठी मिक्स केला जातो. या चिकोडीचा अरोमा किंवा सुगंध अगदी कॉफी सारखाच असतो आणि आजकाल चिकोडीच्या कॉफीमधील प्रमाण बऱ्याचशा कॉफीच्या उत्पादनावर छापले जाते. या चिकोडीमध्ये कोणतेही उत्तेजक सापडत नाही हाच काय तो मूळ कॉफी आणि चिकोडीमधील फरक. या जागी बरीच नवीन झाडे उदा. कोको, कुर्गचे संत्र, तसेच रातांबा(कोकम)ची नर व मादी झाडे जी एकमेकांपासून ठराविक अंतरावर असतील तरच दोन्ही झाडांना फळ धरते असे आम्हाला सांगण्यात आले. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा हि विनंती. इलायची, मिरी, ऍव्होकॅडो , अश्या अनेक प्रकारच्या वनस्पती या प्लांटेशन फार्म मध्ये आहेत. अगदी सफरचंदाचे ४-५ वर्षांपूर्वी यालंगवाद केलेले आणि फळाची वाट पाहत असलेले झाडंही आम्हाला पाहावयास मिळाले. कूर्ग मध्ये सफरचंदाचे झाड पाहण्याचा अनुभव हा लाखमोलाचाच होता. याव्यतिरिक्त जगातील तिखटपणामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली गांधारी मिरची, दालचिनी, कोकोचे बीज अश्या अनेक वनस्पती आम्हाला पाहावयास मिळाल्या. हे पाहून खरेच अनुभवसमृद्ध झाल्यासारखे वाटले. कुर्गमध्ये गेल्यास या ठिकाणास जरूर भेट द्यावी. मस्ट सी असे हे ठिकाण आहे याबद्दल माझ्या मनात दुमत 
नाही. 
ऍव्होकॅडो 

आता सूर्यास्त झाला होता म्हणून आमच्या रेसॉर्टकडे प्रस्थान केले. आजचा दिवस खरेच सार्थकी लागला होता. खूप छान छान अनुभव सोबत होते. त्यामुळे दिवसाची सांगताही खूप छान झाली होती. उद्याचा दिवस आमचा कुर्गमधील शेवटचा दिवस असणार होता. त्यामुळे जमेल तेवढे अनुभव शिदोरीत बांधून ठेवत होतो. उद्या मैसूर ला जायला निघणार होतो. त्यामुळे सामान पॅक करणे क्रमप्राप्त होते. सर्व सामान बांधून झाल्यावर छानपैकी सुग्रास भोजन झाले आणि बेडवर ताणून दिली. 










No comments:

Post a Comment