Monday, January 13, 2020

कूर्ग डायरीज ५

कूर्ग डायरीज ५


दिवस दुसरा :

पहिला दिवस तर छानच गेला होता त्यामुळे कूर्ग सहलीत आणखी काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता तर खूपच होती. कुर्गचे वातावरण खूपच आल्हाददायक आहे. इथला पावसाळा तर खूपच खतरनाक असतो. एकतर वळणावळणाचे डोंगरातून जाणारे अरुंद रस्ते आणि मुसळधार पाऊस यामुळे बाहेर निघणेही कठीण होऊन बसते असे मला काही स्थानिकांनी सांगितले. कूर्ग मधील पावसाचा थोडासा प्रत्यय मला बेंगळुरूहुन कुर्गमध्ये येत असतानाच आला होता. जणूकाही मुसळधार पाऊसधारांनी आमचे स्वागतच होत होते. सुदैवाने पावसाने पूर्ण सहलीत कोणताही व्यत्यय आणला नाही.

जेथे आम्ही राहत होतो त्या प्रशांती रिसॉर्ट मध्ये सुद्धा कॉफीची झाडे आणि मिरीचे वेल होते. कॉफीला लाल बेरी'ज लगडली होती. इथे रिसॉर्टमध्ये काही फुलांचे वेलही होते. त्याचे नाव माहित नाही पण दिसायला हि फुले पक्ष्यांसारखी दिसत, अगदी रंगीबेरंगी. त्याची प्रकाशचित्रे सोबत डकवत आहे. जाणकारांनी त्यावर प्रकाश टाकावा.




आता सुरुवात दुसऱ्या दिवसाची. सहलीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर तयार होऊन स्थलदर्शन करायचे ठरवले होते. कारण एकतर हातात वेळ कमी होता आणि जमेल तेव्हढे स्थलदर्शन आम्हाला करायचे होते , अर्थात उगाचच भराभर स्थळे न पाहता फक्त मोजकी आणि महत्वाची स्थळेच पाहावीत असे आमचे सर्वांचे मत पडले आणि आम्ही निघालो आमच्या आजच्या पहिल्या स्थळाला भेट द्यायला , म्हणजेच मदिक्केरी किल्ला. 

मदिक्केरी किल्ला हा मदिक्केरी सिटीमध्येच आहे. आता तिथे शासकीय कार्यालय आहे. हलेरी वंशाचा राजा मुद्दुराजा याने मदिक्केरी इ.स. १६८१ मध्ये वसवले . त्यावेळी हे शहर मुदराजनकेरी या नावाने ओळखले जात असे. कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन याचे मदिक्केरी असे नामकरण झाले. मदिक्केरी किल्ला मात्र कोडुगु वंशाच्या राजांनी बांधला. मूळचा मातीचा असलेला हा किल्ला पुढे टिपू सुलतानाच्या हातात आला. टिपूने ह्या किल्ल्याची ग्रॅनाईटच्या साहाय्याने पुनर्बांधणी केली आणि याचे नवीन नामकरण जफराबाद असे केले.



(किल्ल्याचे छायाचित्र आंतरजालावरून साभार) 

किल्ल्यात एक चर्चही आहे जे ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८५९ मध्ये बांधले असल्याचा उल्लेख सापडतो . आता या इमारतीत कर्नाटक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संग्रहालय (म्युझियम) चालवले आहे. या संग्रहालयामध्ये आपल्याला मुद्दुराजा ते टिपू सुलतान व ब्रिटिश सरकार पर्यंतच्या पुरातन वस्तू प्रामुख्याने शस्त्रास्त्रे पहावयास मिळतात. वेळेअभावी आम्हाला हे संग्रहालय पाहता नाही आले त्यामुळे एक ऐतिहासिक वारस पाहण्याची संधी हुकल्याची रुखरुख मनास लागून राहिली. 

मदिक्केरी किल्ला पाहिल्यानंतर आमची मोहीम वळाली ते ओंकारेश्वर मंदिराकडे. कर्नाटकातील किंबहुना दक्षिण भारतातील मंदिरे पाहणे हि एक सांस्कृतिक मेजवानीच असते. अत्यंत सुंदर अशी ही मंदिरे बनवताना लागलेले कष्ट याची कल्पनाच न केलेली बरी. पण त्या मंदिरांवरची कलाकुसर पाहताना खरेच भान हरपून जाते. 

श्री ओंकारेश्वराचे मंदिर मदिक्केरी सिटीमध्येच आहे. मार्केटपासून काहि किमी अंतरावर असलेले हे सुंदर मंदिर आणि त्यासमोरचा जलाशय हे दृश्य खूपच मनोहारी आहे. मंदिर बरेच जुने असावे. शिवाचे हे मंदिर म्हणजे दाक्षिणात्य स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे. ओंकारेश्वराचा आशीर्वाद घेऊन आम्ही पोटपूजा करण्यासाठी उडुपी नावाच्या रेस्टॉरंट मध्ये आलो. उत्तम आणि रुचकर शाकाहारी जेवणासाठी हे ठिकाण एक छान पर्याय ठरू शकते. 

जेवण करण्यासाठी सिटीमधीलच उडुपी नावाचे एक छान आणि प्रशस्त आवार असलेले असे रेस्तरॉं आहे. पुन्हा दाक्षिणात्य जेवणाचा आस्वाद घेतला. पण या हॉटेल मध्ये छान उत्तर भारतीय आणि चायनीज पदार्थ सुद्धा मिळतात. एकूणच छान अनुभव होता. 



पोटोबा झाल्यानंतर आम्ही आबे फॉल्स म्हणजे आबे धबधबा पाहायला निघालो. मदिक्केरी सिटीजवळच असलेला हा मनोहारी धबधबा आवर्जून पाहण्यासारखाच आहे. संपूर्ण कूर्ग प्रवासात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे प्रत्येक पर्यटनस्थळावर कचरा होऊ नये यासाठी चोख व्यवस्था होती. आमचा चालक प्रकाश सुद्धा प्लास्टिक इतस्ततः न फेकण्याबद्दल सजग होता. आमच्याजवळील प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक रॅपर्स सुद्धा तो आग्रहानं आमच्याकडून मागून कचरापेटीत टाकत असे. 

आबे धबधबा हा अतिसुंदर जंगलाने वेढलेला आहे. तिथे सुद्धा पर्यटकांची बरीच गर्दी दिसत होती. कावेरी नदीवरच असलेला हा धबधबा खूपच सुंदर दिसतो. येथे पाण्यात उतरण्यास परवानगी नाही. कोणी पाण्यात उतरू नये म्हणून संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. पर्यटकांना धबधबा नीट पाहता यावा यासाठी मचाणाची व्यवस्थाही आहे. एकंदर धबधब्याची व्यवस्था खूपच छान रीतीने करण्यात आली आहे. 



आबे धबधबा पाहण्यास थोडा जास्त वेळ लागला असल्याने त्वरित तळकावेरी साठी निघालो. तळकावेरी हे उंचावर स्थित असलेले कावेरी नदीचे उगमस्थान आहे. मदिक्केरी पासून साधारण ४० किमीवर असलेले तळकावेरी ब्रह्मगिरीच्या उंच डोंगरांमध्ये वसलेले आहे. तळकावेरीच्या रस्त्यावरच भागमंडला हे भागंडेश्वराचे म्हणजेच महादेवाचे सुंदर व प्राचीन मंदिरसुद्धा आहे. 


(भागमंडला मंदिराचे छायाचित्र आंतरजालावरून साभार)

तळकावेरी मंदिर परिसर हा खर्च खूप सुंदर आणि मनोरम आहे. हवेत अजूनही गारवा आणि धुके दिसत होते. मंदिराच्या आवारातून मदिक्केरीचे दर्शन होते. मंदिराची व्यवस्था सुद्धा खूप सुंदर आहे. कावेरी नदीला म्हणजेच "कावेरम्माला"कर्नाटकात खूपच जिव्हाळ्याचे स्थान आहे. कर्नाटकाची जीवनदायिनीच असलेली कावेरी नदी आणि तिचे उगमस्थान पाहताना मनात एक पवित्र भावना उमटली. आपोआपच माझे हात कावेरी मंदिरासमोर जोडले गेले. 

तळकावेरी स्थान पाहून अगदी आपल्या महाबळेश्वरचीच आठवण झाली. अगदी तसाच नयनरम्य परिसर, नागमोडी वळणे आणि थंड गुलाबी हवा असे अगदी रोमांचक वातावरण आपल्याला महाबळेश्वरचीच आठवण करून देते.


(कावेरी मंदिराचे छायाचित्र आंतरजालावरून साभार) 

तळकावेरीहून मदिक्केरीला येताना एक कॉफी प्लांटेशन फार्म आहे त्यास भेट द्यावी असा आमच्या चालकाचा आग्रह होता. आम्हालाही कॉफीच्या शेतीविषयी माहिती हवी होतीच. मग काय दिली भेट त्या फार्मला. 
"Pappy's Coffee Island" असे नाव असलेल्या त्या फार्ममध्ये आम्ही शिरलो. येथे कॉफी प्लांटेशन आणि कूर्ग मधील इतर मुख्य शेतीबद्दल माहिती दिली जाते. यासाठी माणशी रु. २०० आकारले जातात. प्रथमतः हे थोडे महाग वाटेल पण अनुभव लाखमोलाचा मिळतो एवढे निश्चित. पैसे भरल्यानंतर आमची भेट आमच्या मार्गदर्शकासोबत घालून देण्यात आली . काही पर्यटक अगोदरच तिथे होते. मार्गदर्शक हा खरंच खूप ज्ञानी असावा कारण तो आमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित आणि हजारजबाबीपणे देत होता. 

या फार्म मध्ये कॉफीच्या "रोबस्टा" आणि "अरेबिया " या जातींबद्दल माहिती देण्यात आली. तसेच चिकोडी या नवीन पदार्थाबद्दल ऐकायला मिळाले जो एका रानवनस्पतीच्या मुळापासून बनतो आणि ओरिजिनल कॉफीमध्ये प्रमाण वाढवण्यासाठी मिक्स केला जातो. या चिकोडीचा अरोमा किंवा सुगंध अगदी कॉफी सारखाच असतो आणि आजकाल चिकोडीच्या कॉफीमधील प्रमाण बऱ्याचशा कॉफीच्या उत्पादनावर छापले जाते. या चिकोडीमध्ये कोणतेही उत्तेजक सापडत नाही हाच काय तो मूळ कॉफी आणि चिकोडीमधील फरक. या जागी बरीच नवीन झाडे उदा. कोको, कुर्गचे संत्र, तसेच रातांबा(कोकम)ची नर व मादी झाडे जी एकमेकांपासून ठराविक अंतरावर असतील तरच दोन्ही झाडांना फळ धरते असे आम्हाला सांगण्यात आले. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा हि विनंती. इलायची, मिरी, ऍव्होकॅडो , अश्या अनेक प्रकारच्या वनस्पती या प्लांटेशन फार्म मध्ये आहेत. अगदी सफरचंदाचे ४-५ वर्षांपूर्वी यालंगवाद केलेले आणि फळाची वाट पाहत असलेले झाडंही आम्हाला पाहावयास मिळाले. कूर्ग मध्ये सफरचंदाचे झाड पाहण्याचा अनुभव हा लाखमोलाचाच होता. याव्यतिरिक्त जगातील तिखटपणामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली गांधारी मिरची, दालचिनी, कोकोचे बीज अश्या अनेक वनस्पती आम्हाला पाहावयास मिळाल्या. हे पाहून खरेच अनुभवसमृद्ध झाल्यासारखे वाटले. कुर्गमध्ये गेल्यास या ठिकाणास जरूर भेट द्यावी. मस्ट सी असे हे ठिकाण आहे याबद्दल माझ्या मनात दुमत 
नाही. 
ऍव्होकॅडो 

आता सूर्यास्त झाला होता म्हणून आमच्या रेसॉर्टकडे प्रस्थान केले. आजचा दिवस खरेच सार्थकी लागला होता. खूप छान छान अनुभव सोबत होते. त्यामुळे दिवसाची सांगताही खूप छान झाली होती. उद्याचा दिवस आमचा कुर्गमधील शेवटचा दिवस असणार होता. त्यामुळे जमेल तेवढे अनुभव शिदोरीत बांधून ठेवत होतो. उद्या मैसूर ला जायला निघणार होतो. त्यामुळे सामान पॅक करणे क्रमप्राप्त होते. सर्व सामान बांधून झाल्यावर छानपैकी सुग्रास भोजन झाले आणि बेडवर ताणून दिली. 










Friday, January 10, 2020

कूर्ग डायरीज ४


कूर्ग डायरीज ४

दिवस पहिला:

सूर्य उगवायच्या आतच मला जाग आली. आज कूर्ग मधील आमची ही पहिलीच सकाळ. रात्री छान झोप झाल्याने ताजे तवाने वाटत होते. बाहेर येऊन पहिले तर बाहेरचे दृष्य खूपच विहंगम होते. सगळीकडे अगदी घनदाट धुक्याची चादर ओढली गेली आहे असे वाटावे इतके सुंदर दृष्य होते ते. असे वाटत होते की जणू काही आपण आकाशातील ढगांमध्येच संचार करीत आहोत. हे दृष्य पाहून मुलींना उठवले हा अनुभव घेण्यासाठी. त्याही खूप खुश झाल्या ते धुके पाहून.

सर्व विधी आटपून नाश्त्यासाठी रिसॉर्टच्या किचनजवळ आलो. नाश्ता खूपच चविष्ट होता. गरम गरम इडल्या, मेदुवडा आणि डोसा असे टिपिकल दाक्षिणात्य नाश्त्याचे प्रकार जरी असले तरी सुद्धा खूपच चविष्ट होते. नाश्त्याचा फडशा पडून पुढील मार्गक्रमण करण्यासाठी आमच्या ड्राइव्हर प्रकाशशी संपर्क केला आणि कुर्गमधील आमच्या पहिल्यावहिल्या पर्यटनस्थळाला भेट देण्यास आम्ही सज्ज झालो.

राजा'ज सीट :


कूर्ग मध्ये आम्ही पाहिलेले पहिले स्थळ म्हणजे राजा'ज सीट. हे एक सुंदर उद्यान असून सशुल्क असल्याने खूप छान मेंटेन केले गेले आहे. विस्तीर्ण असा परिसर, फुलांची सुंदर बाग , वाघ, हरीण,जिराफ ,हत्ती अश्या प्राण्यांचे पुतळे आणि आल्हाददायी हवा असे अद्भुत कॉम्बिनेशन म्हणजे राजा'ज सीट हे स्थळ. शनिवार असल्याने आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे अपेक्षित गर्दी होतीच. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथे कूर्गचे शासक सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक दर्शन करण्यासाठी येत असत. त्यांच्या आसनाची व्यवस्था म्हणजेच ही राजा'ज सीट . इथला सूर्योदय आणि सूर्यास्त खूपच मोहक असणार यात शंका नव्हती. दुर्दैवाने आमच्याकढे तेव्हढा वेळ नव्हता. राजा'ज सीट हा छायाचित्रकारांची पर्वणीच ठरेल कारण छायाचित्रणासाठी योग्य अशा बरयाच जागा तिथे आहेत. पण काही जागांवर छायाचित्रण किंवा गेलाबाजार सेल्फी काढणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे आपल्या जीवाची काळजी घेऊनच असे प्रताप करावेत.


एकूणच विहंगम अश्या राजा'ज सीटला भेट देऊन बाहेरआल्यानंतर कुल्फी आणि खमंग ,चटकदार भेळीचा आस्वाद घेतला. अगदी मुंबईतल्या चौपाटीच्या फील आला. पण इथली भेळ खरंच खूप चवदार होती. जोडीला आम्ही कैरी आणि अननसाचे तिखटमीठ लावलेले चाट घेतले जे आंबटगोड चवीचे अफलातून कॉम्बिनेशन होते.

राजा'ज सीट पाहून आम्ही ठरल्याप्रमाणे डुब्बारे फॉरेस्ट ला निघालो. डुब्बारे फॉरेस्ट हे कूर्ग सहलीतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ. कारण इथे रिव्हर राफ्टिंग तसेच एलिफंट सफारीचा आनंद घेता येतो. डुब्बारे फॉरेस्ट ला पोचल्यानंतर पाहिले तर आज अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गर्दी दिसत होती. बऱ्याचशा  स्थानिक शाळाहि सहलीसाठी मुलांसह आल्या होत्या. आम्ही पोहोचलो तेव्हा दुपारचे साधारण दोन ते अडीच वाजले होते. एलिफन्ट सफारी साडेचार वाजता सुरु होणार होती म्हणून प्रथमतः रिव्हर राफ्टिंगचे तिकीट काढले.


आयुष्यात पहिल्यांदा प्रॉपर रिव्हर राफ्टिंग करणार होतो तेही पूर्ण कुटुंबासमवेत. त्यामुळे नाही म्हणले तरी पोटात गोळा आला होता. सेफ्टी किट घालून आमची बोट कावेरी नदीच्या पात्रात उतरली आणि पोटातला गोळा थोडा मोठा झाला. आमच्याबरोबर अजून एक युगुल होते. म्हणजे आम्ही पाच जण , ते युगुल आणि आमचा मार्गदर्शक पवन असे आठ जण बोटीत होतो. मी, बायको आई ते युगल असे चौघे आणि मार्गदर्शक पवन असे नाव वल्हवणार होतो. माझी आई पहिल्यांदा असे काही धाडस करणार होती, त्यामुळे ती प्रचंड उत्साहित होती. आम्ही नाव वल्हवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू नदीच्या पात्राच्या मध्यभागी आलो. नदीचे विस्तीर्ण पात्र मध्यभागातून खूपच सुंदर दिसत होते. नाव वल्हवणे किती कठीण काम असते हे क्षणाक्षणाला प्रत्ययास येत होते. हात भरून येण्यास सुरुवात झालीच होती. पण एकंदर खूपच मज्जा येत होती नाव वल्हवण्यास. आमचा मार्गदर्शक पवन यास हिंदीसुद्धा येत असल्याने भाषेचा प्रॉब्लेम नव्हता. तो आम्हाला खूप मस्त समजावत होता. वेळोवेळी काही ठिकाणी जाऊन छायाचित्रण करण्यास सांगे. ते लाईव्ह क्षण टिपणे हे खरेतर अलौकिकच. आम्हाला त्याने काही ठिकाणी पोहोण्यास सुद्धा सांगितले पण पर्यायी कपडे आणले नसल्याने आम्ही तो विचार टाळला. साधारण अर्ध्या तासाच्या रपेटीनंतर आम्ही किनाऱ्यास लागलो. रिव्हर राफ्टिंग नंतर एलिफंट सफारीचा बेत होता पण गर्दी खूप होती. एलिफन्ट सफारीसाठी पात्र ओलांडून पलीकडच्या जंगलात जायचे होते. त्यासाठी सरकारी बोटींची व्यवस्था असते. या बोटीतून पलीकडे जात येते. पण रांग खूप असल्याने आम्ही तो बेत रद्द केला. आता आम्ही निसर्गधाम ला जाण्याचे ठरवले.

भूक लागली होतीच. ड्रायव्हरच्या सल्ल्यानुसार जवळच असलेल्या आर्यन किंवा तत्सम नावाच्या हॉटेलला भेट दिली. मुळात ज्या ठिकाणी आपण भेट देतो तिकडच्या स्थानिक खाद्यप्रकारांचा नक्कीच आस्वाद घ्यावा अश्या मताचा मी आहे. प्रत्येक ठिकाणाची एक खासियत असते मग ती खाद्यप्रकाराच्या स्वरूपात असू शकते किंवा इतर काही. प्रत्येक पर्यटनस्थळांची आपली अशी एक खाद्यसंस्कृती सुद्धा असते आणि तिचा आस्वाद घेणे हे प्रत्येक पर्यटकांचे आद्य कर्तव्य आहे असे मी समजतो. दक्षिणेत जाऊन उत्तरेतील खाद्यप्रकार खाणे शक्यतो टाळावे. अर्थात चांगले स्थानिक खाद्यप्रकार मिळणे हे ज्याच्या त्याच्या नशिबावर किंबहुना अनुभवावर अवलंबून आहे. पण एखाद्या पर्यटकाला जर स्थानिक रेसिपीज चाखायच्या असतील तर थोडे संशोधन करून घरगुती अन्न मिळण्याची ठिकाणे पालथी घालणे गरजेचे आहे . कारण बरेचसें स्थानिक अन्नपदार्थ हॉटेल मध्ये नाही मिळत किंवा त्यांची ऑथेंटिक चव हॉटेलमध्ये न मिळता एखाद्या घरी मिळू शकते.

तर आम्ही या हॉटेलमध्ये पारंपरिक दक्षिण भारतीय थाळी मागवली. दक्षिणेत भात हा मुख्य खाद्यपदार्थ. त्यामुळे ताटातील बहुतांश गोष्टी या भाताशी संलग्न होत्या. सांबार भात तर अप्रतिम होता. गरम गरम भात आणि चवदार सांबार.... भन्नाटच ! जेवण होईस्तोवर संध्याकाळचे साडेचार वाजले होते.

निसर्गधाम हे ठिकाण मदिक्केरी सिटीपासून साधारण ४० किमींवर आहे. आम्हाला तेथे पोहोचेपर्यंत सव्वापाच झाले होते. ड्रायव्हर ने सानित्याप्रमाणे निसर्गधाम हेसुद्धा एक लोकप्रिय स्थळ आहे. निसर्गधाम हे एक मानवनिर्मित जंगलच आहे. येथूनच कावेरी नदीचा एक प्रवाह सुद्धा जातो. आम्ही तिकीटं काढून आत जायला सज्ज झालो. आत प्रवेश करताच कावेरीची दर्शन होते. सुरुवातीलाच नदीवरचा झुलता पूल पार करावा लागतो आणि जंगलात आपण प्रवेश करतो. निसर्गधाम मध्ये बांबूचे विस्तीर्ण जंगल आहे. पाहावे तिकडे बांबूची बेटे . मदिक्केरीच्या पारंपरिक वेशातील जनजीवन निसर्गधाम मध्ये मूर्तिस्वरूपात निर्माण केले गेले आहे. काही ठिकाणी रोप क्लाइंबिंग किंवा तत्सम धाडशी खेळ सुद्धा मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. पण निसर्गधामचे मुख्य आकर्षण म्हणजे कावेरीच्या पात्रातील बोटिंग.


आम्ही अगोदरच रिव्हर राफ्टिंग केले असल्याने आम्हाला बोटिंग मध्ये एव्हढा रस नव्हता. पण एका ठिकाणी नदीचे पात्र उथळ होते तेथे बरेच लोक पोहोण्याचा आणि पाण्याचा आनंद लुटत होते. मुलींचीही इच्छा होती पाण्यात खेळण्याची .... मग काय नेकी और पूछ पूछ! गेलो पाण्यात. तासभर पाण्यात खेळलो . पाणी खूप थंड होते तरीही मुली खुशाल खेळात होत्या. ते पाहूनच मज्जा येत होती. साधारण तासाभरानंतर अंधार पडण्यास सुरुवात झाली आणि पर्यटकांची पांगापांग झाली तसे आम्हीही बाहेर पडलो आणि रिसॉर्टवर परतण्यास तयार झालो. निसर्गधामचा सुंदर अनुभव घेऊन आणि ते विहंगम स्थळ डोळ्यात साठवून आम्ही निसर्गधामच्या शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेश केला. स्वस्त आणि मस्त अश्या वस्तू हे या शॉपिंग सेन्टरचे वैशिष्ट्य. निसर्गधामच्या तिकीट खिडकीजवळच हे प्रशस्त शॉपिंग सेन्टर आहे. मनसोक्त खरेदी करून आम्ही परतीची वाट धरली. एव्हाना रूमवर पोचेपर्यंत आठ वाजले होते. मस्तपैकी चहा घेतिला आणि फ्रेश होऊन जेवण मागवले.

थकलो होतोच त्यामुळे जेवण झाल्यावर तडक बेड गाठला. कधी झोप लागली हे कळलेच नाही आणि कुर्गमधील दुसऱ्या दिवसासाठी सज्ज झालो.






Wednesday, January 8, 2020

कूर्ग डायरीज ३

कूर्ग डायरीज ३

प्रस्थान


आम्ही ज्या मोसमात फिरायला जात होतो हा मोसम खूप गर्दीचा असणार होता कारण नवीन वर्ष येऊ घातले होते. या गर्दीचा वैचार करून आमची सहल आम्हाला पार पाडायची होती. त्यामुळे निश्चितच एक प्रकारचं दडपण मनावर होतं . पण मुलींच्या आणि आमच्या सुट्ट्या याच काळात असल्याने परिस्थितीचा स्वीकार करणे क्रमप्राप्त होते.

बेंगळुरू ते मदीक्केरी हे अंतर सुमारे २७५ ते ३०० किमी आहे. त्यामुळे प्रवासाचे ६ तास लागणार हे नक्की होते. आमचे मुंबईहून फ्लाईट २७ डिसेम्बर ला सकाळी ७ चे होते आणि बेंगळुरूहुन आमचे फ्लाईट ३१ डिसेम्बर ला संध्याकाळी सव्वासहाचे होते त्यामुळे ३१तारखेला आम्हाला मदीक्केरीहून लवकर निघणे गरजेचे होते. आणि ते खूप थकवणारे झाले असते म्हणून आम्ही प्लॅन मध्ये थोडा बदल केला. ३१ तारखेला मदिक्केरीहून निघण्याऐवजी ३० तारखेला निघण्याचे ठरले पण बेंगळुरूला न जात मदीक्केरीहून फक्त पावणे तीन ते तीन तासांवर असलेल्या श्रीरंगपट्टणाला जायचे ठरले.

आमचा मदिक्केरी मधील मुक्काम जिथे होता त्या प्रशांती रेसॉर्टचाच एक भाग असलेल्या श्रीरंगपट्टण येथील "योग धामा रिट्रीट " या ठिकाणास ३० तारखेच्या रात्री मुक्काम करण्याचे आम्ही ठरवले जेणेकरून आमचा वेळही वाचेल आणि दगदगही होणार नाही. हि सोय करून दिल्याबद्दल आम्ही प्रशांतीच्या हरीशजींचे आभार मानले.

हि माझी व्यक्तिशः कर्नाटकची दुसरी खेप. जवळपास १७ वर्षांपूर्वी कर्नाटकला जाणे झाले होते. त्यानंतर कर्नाटकचा कधी संबंध आला नाही. त्यामुळे मीही थोडा साशंकच होतो. बाकी माझे कुटुंब मात्र खुशीत गाजरं खात होते. मुलींचा आनंद तर काय वर्णनावा ! त्या भलत्याच खुष होत्या. त्यांचा हा पहिला विमान प्रवास असणार होता. त्यामुळे त्यांची खरेदीही जोरदार केली गेली होती.

मला मात्र आनंद या गोष्टीचा होता की माझी आई तिचा पहिलावहिला विमान प्रवास करणार होती. अर्थात हि गोष्ट जमवून आणण्याचे श्रेय माझ्या अर्धांगिनीलाच जाते. कारण ती नसती तर आम्ही ही सहल कदाचित प्लॅन नसती केली.

आमची फ्लाईट सकाळी ७ वाजता होती. घरातून सकाळी ५ वाजताच निघालो. वेळेवर टॅक्सीही मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला. एअरपोर्टवरच नाश्ता केला आणि विमानात बसण्यासाठी पळालो. विस्ताराची फ्लाईट आणि कर्मचारी यांनी आमचे स्वागत केले आणि आम्ही आमच्या प्रवासासाठी आसनस्थ झालो.

विमान प्रवासाची पण एक गम्मतच असते. आकाशात उंच उडण्याची मज्जाच काही और. बंगळुरूला धुक्याचे सावट असल्याने विमानाचे उड्डाण थोडे उशिराच झाले आणि बंगळुरूला पोहोचायला थोडा म्हणजे एक तास उशीर झाला. आमचा ड्रायव्हर प्रकाश आमचीच वाट पाहत होता.

सुदैवाने थोडीशी गुलाबी थंडी पडली होती आणि धुके तर होतेच. विमानात पण थोडे खाणे झाले होते त्यामुळे भूक अशी नव्हती. साधारण ११ वाजले होते आणि आणि आम्ही मदिक्केरीला जायला तयार झालो. भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या राजधानीतील स्वागत तर छान झाले होते. पण आम्हाला आतुरता होती कूर्गच्या निसर्गरम्य वातावरणाची.

सहलीच्या पहिल्या दिवसाच्या छान सुरुवातीनंतर आम्ही सर्व ताजेतवानेच होतो. विमानात थोड्या डुलक्या सगळ्यांनीच काढल्या होत्या त्यामुळे थकवा असा नव्हताच. त्यात बेंगळुरूची आल्हाददायी सकाळ, त्यामुळे आम्ही सर्व फ्रेशच होतो.आमचा ड्राइवर प्रकाश हा सुद्धा खूप प्रोफेशनल वाटत होता. त्याच्याशी थोड्या गप्पा झाल्यानंतर कळले कि तो खरेतर मैसूर जवळच्या एका गावातून होता. हसतमुख वाटणारा प्रकाश खरेतर त्याच्या वयाच्या पंधरा वर्षांपासून या व्यवसायात होता. त्याची आम्हाला या सहलीमध्ये कशी खूप मदत झाली हे सविस्तर पुढे सांगेनच.

बेंगळुरू सोडल्यानंतर हायवे वरील एका छानश्या हॉटेलात दाक्षिणात्य पद्धतीचे छान जेवण केले. पुढे रामनगर, चन्नापट्टणम करीत मध्ये कुठेतरी चहा-कॉफीचा आस्वाद घेत आम्ही मार्गक्रमण करीत होतो. प्रवास मोठा होता त्यामुळे थोडाफार त्रास होईल हे आम्ही गृहीत धरले होतेच. पण उतना तो चलताही है . मला खरे तर टेन्शन होते माझ्या आईचे कारण सत्तरी जवळ असताना ती हा प्रवास करीत होती. पण तिचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. मधून मधून मला ती टेन्शन न घेण्यास सांगत होती.

मजल दरमजल करीत एकदाचे मदिक्केरीला पोचलो. मदिक्केरी सिटीपासून आमचे रिसॉर्ट चार किमीवर होते.
प्रशांती रिसॉर्ट मदिक्केरीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले आहे. याचे मालक मूळ मराठीच. त्यांचा महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला मुलगा आदर्श याची आमची भेट झाली. त्यांची भाषा मराठीच पण काहीसा कानडी लहेजा असलेली. अर्थात आदर्शला कन्नड पण येत होती. रिसॉर्टमध्ये चेक इन केल्यानंतर फ्रेश होऊन जेवण मागवलं. जेवण थोडं घरगुती पद्धतीचे दिसत होते. ऑपशन्स पण मर्यादितच . पण चव छान होती. जेवणांनंतर निद्रादेवीला अधीन होण्याची तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी काय मज्जा करायची याच्या योजना आखत झोपी गेलो.

(टीप: माझे हे पहिलेच लिखाण असल्याने काही चुकले माकले असल्यास वाचकांनी मोठ्या मानाने क्षमा करावी हि विनंती)




Monday, January 6, 2020

कूर्ग डायरीज २

कूर्ग डायरीज २

पूर्वतयारी 

हॉटेल बुकिंग आणि विमान तिकिटांचे आरक्षण अगोदरच झाल्यामुळे जीव तसा निर्धास्तच होता. तत्पूर्वी कूर्ग बद्दल खूप जणांकडून माहिती घेतली होती. आंतरजालावरून सुद्धा खूप माहिती मिळाली. कूर्ग हे मुळात एक थंड हवेचे ठिकाण , अगदी आपल्या महाबळेश्वर प्रमाणे . पण कूर्ग मध्ये महाबळेश्वर सारखी स्ट्रॉबेरी नाही पिकत बरं का. तिथले मुख्य आकर्षण म्हणजे कॉफिचे मळे . कू र्गचा बहुसंख्य भाग हा कॉफि आणि मिरी किंवा वेलची अश्या मसाल्याच्या पिकांनी व्यापलेला आहे.

कूर्गची कॉफि जशी प्रसिद्ध तसेच तिथले संत्र सुद्धा प्रसिद्ध आहे. आपल्या नागपूरच्या संत्र्यापेक्षा आकाराने लहान असलेले हे कूर्गचे संत्र चवीला सुद्धा थोडे आंबटच असते. मीठासोबत या संत्र्याची चव भलतीच खुलते. कूर्गची वेलची आणि मिरीसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे.

मुळात कूर्ग हा कर्नाटकातील एक महत्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कोडुगु आणि मदिक्केरी हि दोन ठिकाणे थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. पर्यटनाबरोबरच कॉफी आणि मसाले यांचा व्यापार हा इथला उत्पन्नाचा मुख्य स्रोत. कॉफीचे विस्तीर्ण मळे हे बड्या धेंडांच्या मालकीचेच आहेत. यात बरेचसे उद्योजकहि आहेत. कॉफी आणि मिरीचा मुख्य मोसम हा डिसेम्बर आणि जानेवारीचाच. या मोसमात कॉफीचे फळ धरते आणि पिकते सुद्धा. मी खरेच खूप नशीबवान कारण मला ह्या कॉफी बेरीज पाहायला मिळाल्या. कॉफीचे पीक हे माझ्या माहितीप्रमाणे वर्षातून एकदाच घेतले जाते. त्यामुळे आम्ही सर्व खूप नशीबवान ठरलो. मिरीच्या वेलींना सुद्धा फळ धरले होते. त्यामुळे हा अनुभव आमच्यासाठी खूपच खास ठरला. कॉफीच्या विस्तीर्ण मळ्यांमध्ये सुपारीची आणि सिल्व्हर ओक ची उंचच्या उंच झाडे आणि त्यांना लपेटलेल्या मिरीच्या वेली हे दृष्य खूपच विहंगम होते हे निश्चित.

अश्या या निसर्गरम्य कूर्ग मध्ये आम्ही आमचे ४ दिवस व्यतीत करणार आहोत ह्या कल्पनेनेच मनात आनंदाचे तुषार उसळले आणि आम्ही आमच्या प्रवासाची तयारी पूर्ण केली. माझ्या दोन्ही कन्या खूपच खुशीत होत्या कारण त्यांचा पहिलावहिला विमान प्रवास होणार होता. माझी आई सुध्दा या निमित्ताने पहिल्यांदाच विमानात बसणार होती म्हणून तिचे मनसुद्धा खूप खुश होते.

शेवटी कूर्गला प्रस्थान करण्याची सर्व तयारी झाली आणि तो दिवस जवळ येऊन पोहोचला ज्याची आम्ही जवळपास महिनाभर वाट पाहत होतो. २७ डिसेम्बर २०१९...... 

कूर्ग डायरीज १

कूर्ग डायरीज 

बरेच दिवस माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मनात होते कि कुठे तरी बाहेर फिरायला जावे पण ठिकाण नक्की होत नव्हते. तसा माझा प्रवासाचा अनुभव मर्यादितच आहे. माझा बहुतेक प्रवास हा माझ्या गावाच्या आजूबाजूलाच जास्त झाला आहे म्हणजे सतार , पुणे ,सोलापूर आणि कोल्हापूर व कोकण इतकाच. मुळात मला स्वतःला फिरायला खूप आवडते. कॉलेजला असताना पिकनिक आणि ट्रेकिंगमुळे काही पर्यटनस्थळे फिरण्याचा योग्य आला होता , अर्थात तो अनुभव सुद्धा भन्नाटच होता. परंतु गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबासमवेत प्रवास हा मर्यादित स्वरूपाचाच राहिला. त्यामुळे हि सहल प्लॅन करणे थोडे कठीणच वाटत होते. हो ना करता डिसेंबर २०१९ मध्ये काहीही करून जायचेच असे ठरले... नव्हे नव्हे बायकोने ठरवायलाच लावले आणि शोध सुरु झाला भारतातील उत्कृष्ट पर्यटनस्थळांचा. 

                    आंतरजालावर खूप शोधाशोध केल्यानंतर काही स्थळे शॉर्टलिस्ट केली,उदा. कुलू मनाली, केरळ, कूर्ग, आणि राजस्थान. शेवटी कूर्ग ला जाण्याचे आम्ही सर्वांनी नक्की केले आणि विमानाची तिकिटे आणि हॉटेल्स बघायला सुरुवात केली. खूप माथेफोडी करून मदिक्केरी या कूर्ग मधील जागेत वसलेल्या प्रशांती रिसॉर्टला राहण्याचे ठरवले आणि बुकिंग सुध्दा करून टाकले. दि. २७ डिसेम्बर ते ३१ डिसेम्बर ची तारीख नक्की करून विमानाची तिकिटे आरक्षित केली. प्रशांती रिसॉर्टच्या हरीश जी यांनी फिरण्यासाठी गाडीही अरेंज करून दिली. हे सर्व सोपस्कार किमान सहली आधी १ महिना १० दिवस केले आणि मग फक्त इंतेजार ..... मुंबई ते कूर्ग प्रवासाचा.