Tuesday, July 21, 2020

शिक्षा


गेल्या आठवड्यापासून सतत बेचैन मनस्थितीत होता तो. काही समजत नव्हते त्याला. आपल्या भविष्याचे तारू कोठे जाणार हेच त्याला उमगत नव्हते. सततच्या बेचैनीला तो सुद्धा कंटाळून गेला होता. शेवटी काय होईल त्याला सामोरे जायचे असे मनाला सतत समजावीत होता. गेली तीन वर्षे नुसती फरपट सहन करत होता तो. असल्या जगण्यापेक्षा मरण बरे असे वाटे त्याला. त्या मरणाचीच वाट पाहत होता तो. स्वतःचा खूप राग येत होता त्याला.

"च्यायला, वैताग आलाय नुसता या जगण्याचा. " असे म्हणून पचकन थुंकला तो . आयुष्य कधी कुणाला कसे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. त्याच्याही आयुष्याची कथा काही वेगळी नव्हती. तीन वर्षापूर्वीचे त्याचे आयुष्य आतापेक्षा खूपच वेगळे होते. किंबहुना खूप छान होते. गरिबी होती , कष्ट होते पण वेळेला दोन घास आणि महत्वाची म्हणजे सुखाची झोप होती. पण आयुष्यात आलेल्या त्या वादळानंतर त्याची नुसती फरफटच  झाली होती. तीन वर्षे स्वतःला कोसत होता तो. एकही रात्र नीट डोळ्याला डोळा लागला नव्हता त्याच्या.

"ए, हि घे कापडं अन तयार हो लवकर. कोर्टात जायचंय." तुरुंग रक्षकाने कपडे दिले...दिले कसले फेकले अंगावर. ह्याने गपचूप आपले कपडे घातले आणि तयार झाला. त्याला नंतर कोर्टात नेण्यासाठी गाडी आली. अजूनही काही कच्चे कैदी होते त्याच्या बरोबर.

काही ना बोलता हा आपला ऐकत होता सर्वांच्या गप्पा. आज कोर्टात काय होणार हाच विचार डोक्यात चालला होता. टेन्शन वाढत होते त्याचे. तीन वर्षांपूर्वीच्या त्या घटनेने आयुष्य इतके बदलेल हे त्यालाच काय त्याच्याबरोबरच्या कुणालाही वाटले नव्हते.

गाडीने कचकन ब्रेक मारला अन त्याची तंद्री भंगली. त्याला कोर्टात नेण्यात आले. कोर्टात बरीच वर्दळ होती. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधले कैदी सुद्धा आणले जात होते. पक्षकार तसेच वकिलांची धावपळ चालू होती. टाइपरायटरची खडखड ऐकू येत होती. त्याला न्यायालयाच्या एका दालनात नेण्यात आले आणि दालनाच्या शेवटी असलेल्या कैद्यांसाठीच्या राखीव जागेत बसवण्यात आले. बरोबरचे कैदीही त्याच जागेत बसले आणि कुजबुज करू लागले .

"साला क्या लाईफ है !" बाजूचा एक कैदी करवादला. ह्याने नुसतेच त्या कैद्याकडे बघितले. "कब खतम होगा ये फालतुगिरी पता नै. खालीपिली टाइम खोटी किया. मान तो लिया सबकुछ. अब जल्दी से सजा भी दे दो  यार." असे म्हणून त्या कैद्याने याच्याकडे पहिले अन विचारले ," तुमभी कोई कांड किया लगता है. "
याने काही उत्तर नाही दिले.
 " नये हो?" त्या कैद्याने विचारले तरी हा काहीच बोलला नाही. शून्य नजर लावून न्यायाधीशांच्या खुर्चीच्या मागे असणाऱ्या गांधीजींच्या तसबिरीकडे शून्य नजर लावली होती याने.

" भाई , टेन्शन मत लो ... छुट जाओगे". " मैभी आजहीच छुटूंगा शायद . अपने  वकीलने सेटलमेंट किया है सामनेवाले पार्टी से. खाली मारामारी किया तो हाफ मड्डर का चार्ज लगाया  सालोने. खाली बुंदभर खून निकला होगा उसका . साला मेरे बेटेको चमाट मारा तो धोया साले को."

हा मात्र कंटाळला होता त्या कैद्याची बडबड ऐकून. "ऐकणाऱ्याला रस नसेल तर का बोलतात हे कुणास ठाऊक.!, वयाने मोठा आहे म्हणून काही बोललो नाही आणि असेही बोललो नसतोच म्हणा." मनातल्या मनात हा स्वतःशीच बोलू लागला.

एवढ्यात सर्वजण उभे राहिले. हा देखील उभा राहिला. जज्जसाहेबांनी दालनात प्रवेश केला आणि सर्वांना बसण्याचा निर्देश केला. जज्ज आले तसे याच्या छातीमध्ये कालवाकालव झाली. आज काय होणार या विचाराचे पुन्हा त्याला टेन्शन आले.

कोर्टाचे कामकाज सुरु झाले. वकील आणि पक्षकार यांच्या साक्षी सुरु झाल्या होत्या. आपली केस लवकर न यावी अशी हा प्रार्थना करत होता.

तेवढ्यात त्याच्याच नावाचा पुकारा झाला. त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात नेण्यात आले.

आज खरेतर त्याच्या खटल्याची सुनावणी होणार होती. सर्वांचे डोळे त्याकडे लागले होते. याच्या तर सर्व आशाच संपुष्टात आल्या होत्या. अशीही तीन वर्षे शिक्षा झालीच होती. तीन वर्षांपूर्वीचा तो दिवस त्याला आठवला.

"अरे आरिफ, मत जा किधर , तेरा वो जिजा क्या करता है तेरेको नय मालूम. मत जा उके पास . खालीपिली फस जायेगा एक दिन उसके नाद में . " अब्बू बोलत होते पण ह्याचे काही लक्ष नव्हते. त्याच्या जिजाने म्हणजेच हमजा ने त्याला दुबईला पाठवायचे कबुल केले होते. खरे तर हमजा हा आरिफच्या बहिणीचा म्हणजेच निलोफरचा नवरा. पण खूप आतल्या गाठीचा,एकदम निष्ठुर माणूस. दुबईच्या कुठल्याशा भाईशी त्याचे सख्य होते. म्हणजे त्या भाईची आयातनिर्यात हमजा सांभाळत असे. आता हि आयातनिर्यात कसली होती हे आरिफला नक्की ठाऊक नव्हते कारण तो कोल्हापूर ला त्याच्या आज्जीकडे राहायला होता. गेले एक वर्षच  झाले होते त्याला मुंबईत येऊन.

निलोफर त्याची पाठची बहीण. तिचा खूप जीव होता आरिफवर . पण आरिफ तिच्या नवर्याकडे कामासाठी येतो हे तिला आवडत नसे. तिचा प्रेमविवाह झाला होता हमजाशी. अब्बू परवानगी देत नव्हते तर निलू पळून गेली होती हमजाबरोबर . शेवटी अब्बून्नी तिला शोधून आणून तिचा निकाह लावला. पण आता मात्र निलू स्वतःला दोष देत होती कारण तिला हमजाचा व्यवसाय ठाऊक झाला होता.

 निलू तिच्या परीने आरिफला समजावत असे पण नवऱ्याची बदनामी ना करता . कारण हमजा तिला नंतर बेदम मारेल हि खात्री होती तिला.

त्या दिवशी अब्बू नको म्हणत असताना तो हमजाकडे गेला. त्यावेळी हमजाकडे कोणीतरी बाहेरचा खास पाहुणा आला होता बहुधा. पण बरेच लोक दिसत होते. त्यांच्याकडे शस्त्र सुद्धा असावे कदाचित. तो पाहुणा गेला तरी आरिफला हमजाने बाहेरच उभे केले होते. आत कसली खलबते चालली होती कुणास ठाऊक पण प्रकरण गंभीर असावे हे निश्चित. नेमकी त्या दिवशी हमजाच्या ऑफिसवर पोलिसांनी धाड टाकली आणि आरिफ तिथे असल्याने पोलिसांना सापडला. हमजा पळून जाण्यात यशस्वी ठरला पण आत्याचं दुसरा साथीदार इसाक मात्र पोलिसांच्या हाती लागला. आरिफला नंतर कळले कि हमजाच्या ऑफिसमध्ये बॉम्बसाठी लागणारी स्फोटके सापडली. बॉम्बस्फोटाचा कट रचल्याबद्दल आणि स्फोटके बाळगल्याबद्दल आरिफला अटक करण्यात आली होती. एका दिवसात होत्याचे नव्हते झाले होते.

त्या दिवसाबद्दल आरिफ स्वतःला अजूनही दूषण देत होता. काही चूक नसताना त्याची यात फरफट झाली होती. एक शिकलेला उमदा तरुण एका दिवसात दहशतवादी ठरला होता... ते पण निर्दोष असून.

खटला किती चालेल हे त्याला काही माहित नव्हते. सुटला नाही तरी किमान काही दिवसांसाठी जामिनावर सोडले तरी चालेल पण घरी जायचे होते त्याला. अम्मी -अब्बूची भेट घ्यायची होती त्याला. पण हमजा जो पर्यंत सापडत नाही तो पर्यंत याची निर्दोष मुक्त होण्याची शक्यता नव्हतीच. आणि हमजा तर दुबईला पळाला होता. त्याला आरिफशीच काय पण नीलूशीही काही घेणेदेणे नव्हते.

"आरिफ खान, तुम्हाला काही सांगायचंय? " जज्जसाहेबांचा आवाज घुमला.

"अं ??? " आरिफ भानावर आला. "हेच सरकार कि माझी यात काही चूक नव्हती. मी फक्त माझ्या जिजा ला भेटायला तिकडे गेलो होतो. "

"ठीकाय".

आणि जज्जसाहेबांनी निकाल सांगायला सुरुवात केली. बाकी काही आरिफ ला कळले नाही पण त्याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात येत आहे हे ऐकल्यावर मात्र त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तीन वर्षांची फरफट आज संपणार होती.

सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर तो घरी जायला निघाला. समोरच कोपऱ्यात त्याचे अब्बू उभे होते. त्यांची आरिफशी नजरानजर झाली आणि ते हमसून हमसून रडू लागले. आरिफने जाऊन त्यांना घट्ट मिठी मारली अन म्हणाला," अल्लाह आहे अब्बू,अल्लाह आहे. या खुदा तू मला निर्दोष मुक्त केलेस. अब्बू, पुन्हा नाही तुमचा शब्द मोडणार मी. तुम्ही आणि अम्मी म्हणाल ते करीन , कष्ट करेन आणि खूप पैसे मिळवीन आणि तुम्हाला दोघांना खूप सुखात ठेवीन अब्बू. कसमसे."?

आज कोर्टाच्या आवारात पाऊस नसतानाही श्रावणधार बरसात होती पण सुटकेच्या भावनेची आणि प्रेमाची.